एसटी नाल्यात फसली अन् चोर निसटला

Foto

वाशिम – चोराचीही कमालच म्हणावी लागेल. त्याने चक्क एसटीच पळवली. चोरी केलेली एसटी बस नाल्यात फसली म्हणून सापडली, पण एसटी चोर फरार झाला.

ही घटना घडली आहे, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर-वाशिम रोडवरील गोलवाडी फाट्याजवळ. राज्य परिवाहन महामंडळाच्या अकोला बसस्थानकातून गुरुवारी रात्री एमएच बीटी ०६४२ क्रमांकाची एसटी बस चोरीला गेली. चोराने बस पळवली मात्र मंगरुळपीर-वाशिम रोडवरील गोलवाडी फाटा येथे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात उतरली. चोराला बस नाल्यातून पुन्हा रोडवर आणणे शक्य झाले नसल्यामुळे त्याने बस तिथेचे सोडून पळ काढला, असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शुक्रवारी सकाळी गोलवाडी फाड्याजवळ रोडच्या कडेला बस फसली असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ गोळा झाले. रात्री अपघात झाला असण्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांनी नाल्यात बस फसली असल्याची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. नाल्यात फसलेली बस अपघातग्रस्त नसून चोरीला गेली असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तोपर्यंत अकोला आगारात बस सापडल्याची माहिती पोहोचली. अकोला आगार व्यवस्थापकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.